वारकर्‍यांचा परतीचा प्रवास सुरू; नगर-सोलापूर महामार्गावर वाहनांची झुंबड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जुन । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी झाली असून, विठुरायाच्या दर्शनानंतर वारकर्‍यांनी आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे नगर-सोलापूर महामार्गावर वाहनांची झुंबड उडताना दिसत आहे.


नगर-सोलापूर महामार्गावरून जवळपास 800 दिंड्या व दोन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरीला रवाना झाले होते. अनेक भाविकांनी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी परतीचा प्रवास केला आहे. पायी चालत जाणारे भाविक परतीचा प्रवास करताना बस किंवा खासगी गाड्यांनी जाणे पसंत करतात. गेल्या दोन दिवसांपासून नगर-सोलापूर महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

खानदेश, मराठवाडा, नाशिक या भागातील वारकरी या मार्गावरून परतीचा प्रवास करतात. आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी महामार्गावर अनेक ठिकाणी प्रसादाची सोय करण्यात येते. महामार्गावरील मांदळी येथील आत्माराम बाबा तीर्थक्षेत्राला भाविक आवर्जून भेट देऊन दर्शन घेतात. परतीच्या भाविकांनी मांदळीत देखील भाविकांची मांदियाळी जमा होते. त्यामुळे नगर-सोलापूर महामार्गावर आषाढी एकादशीच्या दिवशी देखील भक्तिमय वातावरण निर्माण होते.

गावागावात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांच्या पायी दिंड्या आयोजित केल्या जातात. मिरजगाव, घोगरगाव, रूईछत्तीशी येथे बालवारकरी दिंड्यानी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. घराघरांतून वारकरी पंढरीला जात असल्याने घरी आल्यानंतर त्यांची पदचरण पूजा केली जाते. यंदा पाऊस नसल्याने सर्वच वारकर्‍यांची आनंदात आणि उत्साहात वारी झाली आहे. परतीचा प्रवास करताना रथाबरोबर जाणारे वारकरी जागोजागी विसावा घेऊन पंढरीला निरोप देताना दिसून येत आहेत. मोटार सायकलवर जाणार्‍या भाविकांची देखील मोठी गर्दी यंदा पाहायला मिळाली. दोन दिवसांत अनेक भाविकांनी पंढरीला जाऊन परतीचा प्रवास सुरू केल्याने महामार्गावर मोठी वाहनांची गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *