महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे एक लाख २० हजार रुपयांचा खर्च होतो. त्यातील ४० टक्के खर्च सरकारकडून सबसिडीच्या माध्यमातून ग्राहकाला मिळतो. केवळ ७२ हजार रुपयांमध्ये सोलर पॅनेल बसविल्यास २५ वर्षांपर्यंत वीजबिल भरण्यापासून मुक्तता मिळेल. लाइट गेली, आली अशा कटकटी देखील बंद होणार आहेत.
दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यास १० तासात १० युनिट वीजनिर्मिती होते एक महिन्यात ३०० युनिट वीज मिळेल. दरमहा १०० युनिट वीज लागत असल्यास उर्वरित २०० युनिट विकून पैसे कमावता येतो. एकदा बसवलेले सोलर पॅनेल २५ वर्षांपर्यंत टिकते. त्याचा मेंटेनन्स (देखभाल-दुरुस्ती) देखील परवडणारा आहे. दहा वर्षांत एकदा २० हजार रुपये खर्चून बॅटरी बदलावी लागते. सोलरपासून निर्माण होणारी वीज मोफतच मिळते. अतिरिक्त वीज सरकारला किंवा खासगी कंपनीला विकता येते, पण त्यासाठी ‘आरएडीए’शी (RADA) संपर्क करावा लागतो. प्रत्येक राज्याच्या राजधानीत तसेच प्रमुख शहरात त्यांची कार्यालये आहेत. ग्राहकांनी वीज विक्रीसाठी त्याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नवीन टेक्नोलॉजीचे सोलर पॅनेल
सहा ते आठ युनिट वीज निर्मितीसाठी दोन किलोवॅटचे सोलर पॅनेल बसवावे लागतात. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले पॅनेल आहेत. त्यामध्ये पुढील व मागच्या दोन्ही बाजूंनी वीज निर्माण होते. त्यामुळे दोन किलोवॅटसाठी चार सोलर पॅनेल पुरेसे होतात. सोलर ऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सोलर रूफटॉप योजना सुरू केली आहे.
अनुदानाची रक्कम किती?
सरकारच्या अनुदानासाठी, डिस्कॉम पॅनेलमधील कोणताही ठेकेदार निवडून त्याच्याकडून सोलर पॅनेल बसवावे लागते. रुफटॉप सोलर पॅनल तीन किलोवॅटपर्यंत बसवल्यास सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. १० किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर २० टक्के सबसिडी (एक किलोवॅटसाठी अंदाजे १४ हजार ३०० रुपये) मिळते. सुरवातीला ‘एमएसईबी’कडे अर्ज करावा, त्यानंतर नॅशनल पोर्टलवर अर्ज करायचा. डिटेल्स सबमिट केल्यावर व ठेकेदार निवड करावी. त्यानंतर पुढील प्रक्रिया महावितरण करेल आणि पहिले बिल अपलोड झाल्यावर ४५ दिवसात सबसिडी मिळते.
अर्ज करताना ‘हे’ लक्षात ठेवा….
– नॅशनल पोर्टल उघडल्यावर पहिल्यांदा राज्य, वीज वितरण कंपनी निवडा.
– तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाकून स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल टाका.
– वापरकर्ता व मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करा आणि फॉर्मनुसार ‘रूफटॉप’साठी अर्ज करा.
– DISCOM च्या मंजुरीची प्रतीक्षा करा. मंजुरीनंतर नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या.
– सोलर बसवल्यानंतर त्याचे डिटेल्स सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
– DISCOM द्वारे नेट मीटर लावल्यानंतर तपासणी होऊन ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
– कमिशनिंग रिपोर्टनंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे डिटेल्स, कॅन्सल चेक सबमिट करावा. त्यानंतर ४५ दिवसांत अनुदान मिळते.