Maharashtra Rains: राज्यात पुढचे २४ तास धोक्याचे ; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळतं. राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आणखी काही दिवस जोरदार पाऊस असेल. तर मुंबईसह परिसरात मुसळधार पावासाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस विकेंडलाही कोसळणार आहे. हवामान विभागाने आज, पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD मुंबईने याबद्दलचा इशारा दिला आहे.

कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट…
IMD मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे, रायगड आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज पडल्यासच घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *