महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारी नवीन तळ गाठला. इतिहासात पहिल्यांदा वेस्ट इंडिजची टीम वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय. वनडे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजच आव्हान संपुष्टात आलं. 1990 पर्यंत क्रिकेट विश्वात वेस्ट इंडिजच्या टीमचा एक दबदबा होता. या टीमला पराभूत करणं सोपं नव्हतं. पण आताची वेस्ट इंडिजची टीम त्याच्या आस-पासही नाही. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कपसाठी सुद्धा वेस्ट इंडिजची टीम पात्र ठरली नव्हती.

यंदा भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. त्यात वेस्ट इंडिजची टीम खेळताना दिसणार नाही. वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या टीमकडून पराभव झाला.
का सगळे सामने जिंकायचे होते?
पहिल्या दोन पराभवांमुळे वेस्ट इंडिजसाठी वर्ल्ड कप पात्रता फेरीत सुपर सिक्सचे सगळे सामने जिंकणं आवश्यक बनलं होतं. पण स्कॉटलंडने त्यांचा पराभव केला आणि वेस्ट इंडिजच वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. वनडेमध्ये स्कॉटलंडकडून झालेला वेस्ट इंडिजचा हा पहिला पराभव आहे.
‘ही लाजिरवाणी बाब’
वेस्ट इंडिजच्या पराभवाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसलाय. हरारे स्पोर्ट्स क्लबवर उपस्थित असलेले तसच सोशल मीडियावर देखील अनेकांनी निराशा व्यक्त केली. टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजच्या या पराभवावर परखड भाष्य केलं. ही लाजिरवाणी बाब असल्याच सेहवागने म्हटलय.