महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । Australia defeats England : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत यजमान इंग्लंडवर ४३ धावांनी विजय साकारला आणि पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे आता उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंडवरील दबाव वाढला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ३७१ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवण्यात आले होते. इंग्लंडच्या संघाने चौथ्या दिवसअखेरीस ४ बाद ११४ धावा फटकावल्या होत्या. बेन डकेट व बेन स्टोक्स या जोडीने इंग्लंडसाठी मोलाची कामगिरी बजावली. ही जोडी स्थिरावणार, असे वाटत असतानाच जॉश हॅझलवूडच्या गोलंदाजीवर डकेट ८३ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टोलाही मोठी खेळी करता आली नाही. कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर क्रीझ सोडल्यानंतर अॅलेक्स कॅरीने त्याला १० धावांवर यष्टिचीत केले.
स्टोक्सची अपयशी झुंज
इंग्लंडचा संघ ६ बाद १९३ धावा अशा संकटात असताना कर्णधार बेन स्टोक्स याने २१४ चेंडूंमध्ये १५५ धावांची दमदार खेळी केली. स्टोक्स इंग्लंडला जिंकून देणार असे वाटत असतानाच जॉश हॅझलवूड ऑस्ट्रेलियासाठी धावून आला. हॅझलवूडच्या गोलंदाजीवर स्टोक्स ॲलेक्स कॅरिकरवी झेलबाद झाला. या खेळीत त्याने ९ चौकार व १ षटकार मारले. त्यानंतर इंग्लंडचा डाव ३२७ धावांवरच संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४१६ धावा आणि दुसरा डाव सर्व बाद २७९ धावा विजयी वि. इंग्लंड – पहिला डाव सर्व बाद ३२५ धावा आणि दुसरा डाव सर्व बाद ३२७ धावा.