![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून तीन तास वाहतुकीत बदल केला जाणार आहे. चार ते १५ जुलैदरम्यान ‘मल्टिअॅक्सल’ वाहनांसाठी हा रस्ता तीन तास बंद राहणार आहे. इतर वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळविण्यात येणार आहे.
चांदणी चौक प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्प्यात आहे. नवीन एनडीए-पाषाण मुख्य पुलाचे काम ‘सबस्ट्रक्चर’ पातळीपर्यंत झाले असून, ‘सुपरस्ट्रक्चर’चे काम प्रगतिपथावर आहे. त्या अनुषंगाने चार ते १५ जुलै दरम्यान मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन असा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त ‘मल्टिॲक्सेल’ वाहनांची वाहतूक तीन तासांसाठी रोखण्यात येणार आहे.
ही वाहने एक्स्प्रेस-वेवर थांबविली जातील. मुख्य महामार्गावरील (मेन कॅरेजवे) वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचा वापर करतील. मुंबईकडून सातारा/ कोथरूडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सर्व्हिस रोड आणि ‘रॅम्प’ सहाचा वापर करतील. सातारा आणि कोथरूडमार्गे (पुणे शहर) मुंबई आणि मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवनाच्या बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड आणि ‘रॅम्प’ आठचा वापर करण्यात यावा. इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही, अशी माहिती ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
