मान्सून ; देशभरात पुढील पाच दिवस पावसाचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, दोन जुलै रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे आठ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा सहा दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे. देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून, पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

होसाळीकर म्हणाले, साधारणपणे आठ जुलै रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापतात. यंदा सहा दिवस अगोदर दोन जुलै रोजीच मोसमी वाऱ्यांनी सर्व देश व्यापला आहे. एक जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा पाऊस आठ दिवस उशिराने आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला. अकरा जूनला तळकोकणात दाखल झाला. २३ जूनपर्यंत मोसमी पाऊस तळकोकणाच होता. २४ जूनपासून मोसमी वाऱ्यांनी आगेकूच सुरू केली. २५ जून रोजी पुणे, मुंबईसह, दिल्लीपर्यंत धडक दिली आणि दोन जून संपूर्ण देश व्यापला आहे.

किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा
महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मध्य भागात कमी दाबाचा क्षेत्र कायम आहे. बंगालचा उपसागरात आणि आंदमान बेटाजवळ वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती मोसमी पावसासाठी अनुकूल असून, येत्या पाच दिवसांत देशात सर्वदूर चांगला पाऊस होईल, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली.

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *