अभिमानास्पद !! अंबाजोगाईचे दोन सुपुत्र झाले सैन्यदलात लेफ्टनंट; सुमित हरंगुळे आणि सौरभ लुगडे यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बीड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड -अंबाजोगाईतील सुमित शिवानंद हरंगुळे आणि सौरभ बाबासाहेब लुगडे या दोन तरुणांची भारतीय सैन्यादलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. सैन्य दलातील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या दोघांनाही लेफ्टनंट पदावर नियुक्ती देण्यात आली. एकाच दिवशी दोन सुपुत्रांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याने अंबाजोगाईच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला आहे.

सुमित हा अंबाजोगाई येथील प्रसिद्ध व्यापारी शिवानंद हरंगुळे यांचा सुपुत्र आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाईतील योगेश्वरी नुतन विद्यालयात झाले. सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील शासकीय सैनिक स्कुल येथे झाले. यानंतर सुमितने युपीएससीची परीक्षा देत नँशनल डिफेन्स अकादमी पुणे येथे तीन वर्षाचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्याची लेफ्टनंट पदासाठी निवड झाली. भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील प्रशिक्षण केंद्रात एक वर्षाचे प्रशिक्षण सुमितने पुर्ण केल्यानंतर त्याची सिक्कीम येथे लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.

सौरभ लुगडे याला भारतीय सैन्याचा वारसा आहे. त्याचे वडील बाबासाहेब लुगडे हे सैन्यदलातून लेफ्टनंट कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सौरभचे सातवीपर्यंतचे शिक्षण सैनिकी शाळेत झाले. आठवी ते दहावी तो अंबाजोगाईतील सरस्वती पब्लिक स्कूलमध्ये होता. पुण्याच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातून बीटेक पूर्ण केल्यानंतर त्याची थेट भारतीय सैन्य दलाच्या डेहराडूनयेथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शनिवारी झालेल्या दीक्षांत समारोहानंतर उत्तर प्रदेशातील मेरठ येथे सौरभची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली.

एकाच दिवशी दोन सुपुत्रांची निवड लेफ्टनंट पदी झाल्याने अंबाजोगाईच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला आहे. दोन्ही कर्तबगार तरुणांच्या निवडीचे सर्वत्र कौतूक होत असून हरंगुळे आणि लुगडे परिवारावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *