महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रं देखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून सुशांतनं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली एक्झिटनं सगळ्यांनाच धक्का बसला. कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यामधून त्यानं आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे. कूपर रुग्णालयातून सुशांतचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सुशांतच्या अवयवांमध्ये कोणत्याही प्रकारचं विष आहे का, याची तपासणी जे. जे. रुग्णालयात केली जाईल.
सुशांतनं काल (रविवारी) त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री सुशांतनं एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्यानं फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या ६ महिन्यांपासून नैराश्यानं ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुशांतनं ज्युस मागवला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा लॉक होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं. त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात चार जण राहतात. त्यामध्ये दोन आचारी, एक नोकर आणि एका आर्ट डिझायनराचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे.