Ajit Pawar NCP : छगन भुजबळ ,अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी ‘ही’ बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै ।राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी भूकंप झाला आणि पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांच्यासह पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काल झालेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यात अजित पवार गटाकडे संख्याबळ असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

आज दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठक संपन्न होत आहे. परंतु त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट हाती येतेय. उद्या होणाऱ्या एका बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र येणार आहे.

उद्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची एक बैठक संपन्न होत आहे. या समितीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीसाठी तिन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे.पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने बैठक होत असल्याने अधिवेशनातील सत्र कसे असतील, नियोजन कसं असेल यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.

मात्र हे तिन्ही नेते बैठकीसाठी उपस्थित राहतात का? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. उद्या दुपारी १२ वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे.

दरम्यान, शरद पवार हे नाशिकमधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं असून आपणही प्रत्युत्तर दौरा करु, असं सांगितलंय. त्यामुळे येत्या काही काळातमध्ये राज्यात काका-पुतण्याचा कलगितुरा अनुभवायला मिळेल, हे नक्की.

जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. शिवाय उर्वरित आमदारांना व्हिप बजावण्यात आलेला होता. शरद पवार गटाकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *