महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । Maharashtra Politics: अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. परंतु या भूकंपाचे हादरे असे सहजासहजी थांबणारे नाहीत. आणखी पुढे मोठमोठे धक्के राज्याला सहन करावे लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. भाजपचा नवा फॉर्म्युला आधीच ठरल्याचं समोर येतंय.
‘अजित पवार हे भाजपमध्ये आले ते मुख्यमंत्री होण्यासाठीच’ असं ठामपणे बोललं जात आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदेंचं पुनर्वसन करणं, हे भाजपपुढे आव्हान असेल. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ही मांडणी आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वाऱ्या करीत होते. त्याचसोबत खासदार श्रीकांत शिंदे यांचंही दिल्लीला जाणं होई. तेव्हा काही उलगडा झालेला नव्हता. आता मात्र त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ठाम शक्यता पुढे येतेय.