पहिल्याच पावसात पुण्यातील रस्त्यांची चाळण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । गेल्या आठवड्यापासून शहरात पाऊस सुरू झाला अन् पहिल्या पावसात उपनगरांत विविध रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे चित्र दिसून आले. खड्डे पडून अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रस्त्यांवर पाणी न तुंबण्याचा महापालिकेचा दावा दरवर्षाप्रमाणे यंदाही फोल ठरला आहे.

महापालिकेचे पितळ उघडे
हडपसर : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे परिसरातील रस्त्यांवर सध्या पावसाच्या पाण्याची तळी साचली आहेत. यानिमित्ताने रस्ता दुरुस्तीचा देखावा करणार्‍या महापालिकेचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पाडल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. हडपसर परिसरात महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी जुन्या वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

मात्र, थोड्याशा पावसातही ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वैभव टॉकीज, मोईनतारा कॉर्नर, ससाणेनगर रस्ता, गाडीतळ बसस्थानक, लोहिया उद्यान रस्ता परिसर, मगरपट्टा चौक, नोबल रुग्णालय चौक, डीपी रस्ता, माळवाडी रस्ता, जुने पोस्ट ऑफिस, साधना सोसायटीमागील रस्ता, अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोर आणि भोसलेनगर परिसरातील नोबल हॉस्पिटल कॉर्नर रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत असल्याचे अ‍ॅड. अलोक गायकवाड, रविराज देशमुख, कुमार तुपे, संतोष खरात, पितांबर धिवार, अझीम पठाण आदींनी सांगितले.

खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट
वाघोली परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पीएमपी बसस्थानकाच्या मागील बाजूने जाणार्‍या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, त्यात सध्या पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या नागरिक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास सहन करवा लागत आहे. आव्हाळवाडी फाटा ते वाघोली दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

रायसोनी कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे पडून त्यात पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, परिसरातील अनेक सोसायट्यांकडे जाणार्‍या रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे.भावडीकडे जाणार्‍या रस्त्यावर सध्या पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने या रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *