पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून त्या वेगवेगळ्या पार्टीत जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडेही भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा समीकरण बदलणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. या चर्चेवर आता पंकजा मुंडे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

“2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक निर्णय झाले. मला उमेदवारी न मिळाल्याने मी नाराज असल्याचे म्हटलं गेले. अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्पष्टपणे भूमिका मांडल्या आहेत. परत परत भूमिका मांडण्याचं माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. गेले काही दिवस अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर चांगलं आहे असे भाष्य केले होते. याबाबत मी फारसं भाष्य केले नाही. परवा आलेल्या बातमीमध्ये सांगितलं की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि मी कॉंग्रेसच्या वाटेवर आहे. या संदर्भात मी मानहाणीचा दावा ठोकणार आहे. माझं करिअर हे कवडीमोलाचं नाही. गेली 20 वर्षे मी राजकारणात आहे त्यामुळे मी लोकांसोबत थेट संवाद साधते,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

“माझ्यावर पंकजा मुंडे यांचे संस्कार आहेत. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचे रक्त माझ्या शरीरात नाही. खुपसलेला खंजीर कसा योग्य आहे हे सांगण्याचे माझ्याकडे शब्द नाहीत. प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचे नाव येतं. हा माझा दोष नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला हवं. संधी मिळाली नाही म्हणून मी कुठेही टिप्पणी केली नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझी भूमिका नेहमी थेट असणार आहे. मी स्पष्टपणे सांगते की कुठल्याही पक्षातील कुठल्याही नेत्यासोबत माझ्या पक्ष प्रवेशासंदर्भात माझा संवाद नाही. माझ्या पक्षाला माझा सन्मान वाटत असेल अशी माझी अपेक्षा आहे. माझा प्रवास हा पारदर्शक राहिलेला आहे. लपून छपून मी काम करत नाही,” असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

“गेल्या 20 वर्षांपासून मी सुट्टी घेतलेली नाही. मला एक दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मलाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आमदार झाले तेव्हा मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं की, राजकारणात जी विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आले त्याच्याशी प्रतारणा करावी लागेल तेव्हा राजकारणातून बाहेर पडताना मागे पुढे पाहणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये मला ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे. ेक दोन महिने मी सुट्टी घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी विचार करणार आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *