महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱयाचा शुभारंभ येवला येथून होत आहे. उद्या, 8 जुलै रोजी येवल्यात होणाऱया जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मिंधे सरकारमध्ये सामील झालेले मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असल्याने या सभेकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.
राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे या सरकारमध्ये मंत्री झाले. बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. या दौऱयाचा शुभारंभ शनिवारी येवल्यातून होत आहे. दुपारी तीन वाजता येवला येथील बाजार समितीच्या आवारात शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ऍड. माणिकराव शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, विरोधी पक्षनेते, प्रतोद जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले, खासदार अमोल कोल्हे आदी हजर राहणार आहेत.
शरद पवार यांचे येवल्यात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, संभाजी पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आदी यावेळी हजर राहणार आहेत.
