महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । देशातील आठ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, किनारी गोवा-कर्नाटक आणि नागालँडमधील अनेक भाग पाण्यात बुडाले.
कर्नाटकात पावसामुळे आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये 154 रस्ते बंद करण्यात आले. आसाममधील 6 जिल्ह्यांतील 121 गावांतील सुमारे 22 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.
IMD नुसार पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडेल. 8 ते 9 जुलै दरम्यान जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर छिन्काजवळ दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. संध्याकाळी 5 तासांनंतर रस्ता सुरु झाला.
दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. मुसळधार पावसानंतरही आतापर्यंत ८४ हजार ७६८ भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे.
पुढील २४ तास कसे असतील…
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस : राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, गोवा.
या राज्यांमध्ये हलका पाऊस : बिहार, तेलंगणामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
या राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील: आंध्र प्रदेशची रायलसीमा, महाराष्ट्रातील मराठवाड आणि पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही.