महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रे्समध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे विखुरलेला पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरेलत. अजित पवारांनी बंडखोरी करताना पवारांवर सुप्रिया सुळेंमुळे आपल्याला संधी देण्यात येत नसल्याचा आरोप केला होता. पवारांनी मुंबई तक नामक न्यूज पोर्टलशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले – मी अजितला राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीपद दिले. तीन-चारदा उपमुख्यंमत्रीही केले. याऊलट सुप्रियाला काय दिले? तुम्हीच तुलना करा.
अजित पवारांना काही कमी केले नाही
अजित पवारांनी बंडखोरी करताना ते तुमचे पुत्र नाहीत म्हणून त्यांना संधी मिळाली नाही, असा आरोप केला. हे सर्वकाही उत्तराधिकारी निवडल्यामुळे घडले का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले. माझी यावर जास्त बोलण्याची इच्छा नाही. विशेषतः कुटुंबाशी संबंधित मुद्यावर मला फार बोलायाचे नाही. ते मला आवडतही नाही. केवळ एकच गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की, अजित पवार यांना सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री केले. एवढेच नाही तर त्यांना तीन ते चारवेळा उपमुख्यमंत्री म्हणूनही संधी दिली.
सुप्रियाला नव्हे इतरांना संधी दिली.
शरद पवार पुढे म्हणाले की, आता ते सुप्रियाविषयी बोलत आहेत. तुम्हीच तुलना करा. एकाला तीन-चारवेळा उपमुख्यमंत्री व एकदा मंत्रीपद दिले. आणि दुसऱ्याला एकही असे महत्त्वाचे पद दिले नाही. केंद्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्याला मंत्रीपदाची संधी मिळाली, तेव्हा आम्ही सूर्यकांता पाटील यांना संधी दिली. त्यावेळी सुप्रिया सुद्धा खासदार होती. त्यानंतर पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाली, तेव्हा पी ए संगमा यांच्या मुलीला संधी देण्यात आली. तेव्हाही सुप्रिया संसदेत उपस्थित होत्या. त्यानंतर तिसऱ्या वेळी प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्यात आली. पण मी सुप्रियाला एकदाही मंत्रीपदाची संधी दिली नाही, असे पवार म्हणाले.
घराणेशाहीचे आरोप निराधार
प्रफुल्ल पटेलांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. सुप्रिया सुळे लोकसभेत निवडून आल्या असतानाही मी इतर लोकांना संधी दिली, असे शरद पवार आपल्यावर होणारे घराणेशाहीचे आरोप निराधार असल्याचा दावा करत म्हणाले.
भाजप मुख्यालयात शिजला कट
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा गेम प्लॅन भाजपच्या मुख्यालयात तयार झाला आहे. ते जसे सांगत आहेत, तसे आमचे सहकारी करत आहेत. यापेक्षा कोणतीही वेगळी गोष्ट नाही, असेही शरद पवार यावेळी अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधताना म्हणाले.