“तिसरा उपमुख्यमंत्री किंवा दोन मुख्यमंत्री करता येणार नाहीत”, गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । राज्याच्या राजकारणात अलिकडच्या काळात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. अनपेक्षित युत्या-आघाड्या बनत आहेत. अनेक पक्षांमधील निष्ठावान म्हटले जाणारे नेतेही पक्ष बदलताना दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अनेक आमदारांना बरोबर घेत वेगळा गट स्थापन केला. या गटासह ते सत्तेत सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथदेखील घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील आणि काँग्रेसमधील अनेक नेते संपर्कात असल्याचे दावे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून होत आहेत.

याचदरम्यान, ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीतले अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा केला आहे. महाजन म्हणाले, इतके जण संपर्कात आहेत की, कोणाला घ्यावं आणि कोणाला काय द्यावं, हा एक आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. संपर्कात अनेकजण आहेत, पण त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत.

यावेळी गिरीश महाजन यांना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या चर्चांवर विचारल्यावर महाजन म्हणाले, तेही माजी मुख्यमंत्री आहेत, तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते माजी मुख्यमंत्री आहेत. आम्हाला पुन्हा तिसरा उपमुख्यमंत्री करता येत नाही किंवा दोन मुख्यमंत्री करता येत नाहीत. सगळ्यांचा मान-सन्मान ठेवला पाहिजे. इतके जण संपर्कात आहेत की, कोणाला कसं घ्याययं आणि काय द्यावं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. मी एवढंच सांगेन की, लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात बऱ्याच घडामोडी झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *