महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार यांनी बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबतचा वाद निर्माण झाला. अशातच शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्याविरोधात ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर आता 31 तारखेला सुनावणी होणार आहे.(Latest Marathi News)
सत्तासंघर्षाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता.आता निवडणूक येऊ शकतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तातडीने सुनावणी करावी असं ठाकरे गटाने म्हंटलं होतं. तर या ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार का किंवा काही नवीन निर्देश यावेळी देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.