महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालं असता बऱ्याचदा ठराविक तासांनंतर या प्रवासाचाही कंटाळा येऊ लागतो. बरीच मंडळी प्रवासादरम्यानचा हा वेळही कसा व्यतीत करता येईल याचा शकला लढवतात. मग ते बैठे खेळ असो किंवा गप्पांचा फड असो.
काहीजण मात्र या रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या आसनावरच खिडकीपाशी किंवा मग रेल्वेच्या दारापाशी उभे राहून सिगरेट- विडी ओडताना दिसतात. मुळात रेल्वेमध्ये धुम्रपान निषिद्ध असूनही त्यांच्या या कृती सुरुच असतात. रेल्वेनं आखून दिलेल्या या नियमाचं पालन होत नसल्यामुळं आता मात्र यंत्रणांकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. ज्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या डब्यांमध्ये स्मोक डिटेक्टर यंत्रणा लावण्यात आली आहे. या यंत्रांमुळं सिगरेट ओढताच या डिटेक्टरच्या नजरेत तुम्ही याल आणि लगेचच रेल्वे अधिकारी तुमच्यावर कारवाई करतील.
गेल्या काही काळापासून सातत्यानं धुम्रपान न करण्यासंबंधीच्या नियमांचं उल्लंघन रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी केल्याचं पाहिलं गेलं आहे. आता मात्र ही सर्व मंडळी संकटात सापडू शकतात. एसी डब्यांमध्येही ही यंत्रणा , रेल्वेच्या 204 गाड्यांच्या स्लीपर क्लासमध्ये स्मोक डिटेक्टर लावण्यात आले असून, 24 एसी डब्यांमध्येही ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान केल्या जाणाऱ्या धुम्रपानामुळं बऱ्याचदा आग लागण्याचा धोका संभवतो. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.