महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स आणि ट्रकची जोरदार धडक झाली असून या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधील 20 प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. यात बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एक जण गंभीर
छत्रपती संभाजीनगरमधील सावंगी येथे झालेल्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 11 जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. 9 जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
गेटवर ट्रकने दिली धडक
सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. रात्रीच्या सुमारास सावंगीजवळील समृद्धी महामार्गावर गेट नंबर 16 वर खुराणा ट्रॅव्हलला ट्रकने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. ही धडक एवढी भीषण होती की, यात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आणि अनेक प्रवासीही जखमी झाले.
समृद्धी महामार्गावर प्रवास करायचा की नाही?
समृद्धी महामार्गावर गेल्या 6 महिन्यांत झालेल्या 375 हून अधिक अपघातात तब्बल 95 जणांना जीव गमवावा लागला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या अपघातानंतर “समृद्धी’वर जायचे की नाही, अशी भीती अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. “समृद्धी’वर प्रवास करण्यास हरकत नाही, फक्त काळजी घ्यावी लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.