महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । अजित पवार यांच्या नेतृत्वात युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन १० दिवस उलटले तरी अद्याप त्यांना खातेवाटप झालेले नाही. हे मंत्री महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही असून भाजप व शिंदेसेना मात्र ती सोडण्यास तयार नाही. गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात या विषयांवरून मध्यरात्री बैठका घेऊन खल सुरू आहे. खातेवाटपाबाबत मात्र अजून तोडगा निघाला नसल्याने या मंत्र्यांच्या कामालाही सुरुवात झालेला नाही. अखेर या निर्णयाची वाट न पाहता सरकारने या ९ पैकी ७ मंत्र्यांना मंगळवारी सरकारी बंगल्यांचे व दालनांचे वाटप करून टाकले.
ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना सिद्धगड (बी ६), हसन मुश्रीफ यांना विशालगड (क ८), दिलीप वळसे पाटील यांना सुवर्णगड (क १), धनंजय मंुंडेंना प्रचितगड (क ६), धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुची-३, अनिल भाईदास पाटील यांना सुरुची- ८ व संजय बनसोडे यांना सुरुची १८ या बंगल्यांचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते असल्यापासून ‘देवगिरी’ बंगल्यात राहतात, त्यांचा मुक्काम यापुढेही तेथेच असेल. तर, एकमेव महिला मंत्री अदिती तटकरेंना मात्र अद्याप बंगल्याचे वाटप झालेले नाही.