महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । राष्ट्रवादी मंत्र्यांच्या शपथविधीची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नसावी, असे स्पष्ट करत राज्यातील भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) असे तीन इंजिनचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असे भाकित प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. ( Maharashtra Politics )
पहिले ज्यांना डोक्यावर घेतले त्यांना खाली टाकून दिले
बच्चू कडू म्हणाले की, पहिले ज्यांना डोक्यावर घेतले त्यांना खाली टाकून दिले. यानंतर दुसर्यांना डोक्यावर घेतले आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरकारमधील प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेली वर्षभर केवळ मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा सुरु आहे. मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. दुसर्यांदा झालेल्या शपथविधीवेळी आमचा विचार झाला नाही, अशी खंत व्यक्त करत राजकारणाला काही मर्यादा असणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नको, अशी माझी नाही तर शिवसेना आमदारांची मागणी आहे, असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या मंत्रीमंडळातील सहभागावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.