Kedarnath Dham Yatra : केदारनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे स्थगित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील सोनप्रयाग आणि गौरीकुंड येथे केदारनाथ यात्रा (Kedarnath Dham Yatra) थांबवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (दि.१२) दिली. खराब हवामानामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे जिल्हा प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

गेली पाच दिवस उत्तर भारतात पावसाने थेैमान घातले आहे. पावसामुळे उत्तराखंडमधील सोनप्रयाग आणि गौरीकुंड येथे केदारनाथ यात्रेतील भाविकांना थांबवण्यात आले आहे. पावसामुळे चार राज्य मार्ग आणि १० लिंक रोडवरील वाहतूक ठप्‍प झाली आहे. मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्‍या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उत्तराखंडमध्‍ये भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (दि.१२) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Kedarnath Dham Yatra)

राज्यात करण्यात आलेल्या खबरदारीच्या व्यवस्थेबाबत बोलताना उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री धामी म्हणाले की, “येथे दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होते आणि नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते. आम्ही पूर्णतः सुरक्षित आहोत. सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी आणि आमच्या आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी त्यांचे काम करत आहेत. या सर्वांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी अलर्ट मोडमध्ये राहण्यास सांगितले आहे. आमच्या इतर संस्था देखील यावर काम करत आहेत. एनडीआरएफ, आर्मी आणि आमचे पीडब्ल्यूडी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभाग तयार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सतत लोकांच्या संपर्कात आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *