Edible Oil : टोमॅटोनंतर आता खाद्यतेलाचे दर भडकण्याची भीती, काय घडलं? तेलबिया उत्पादनात महाराष्ट्राची बाजी पण..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । देशातील खाद्यतेल निर्यातीत यंदा २० ते २५ टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे. ही भरमसाट निर्यात खाद्यतेल दराच्या मुळावर आली आहे. त्यामुळे आयातशुल्क कपातीनंतर घटलेले दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश आहे. भारतात एकूण मागणीच्या जवळपास ४० टक्के तेलबियांचे उत्पादन होते. असे असतानाही सुमारे ७५ टक्के तेल किंवा तेलबियांची आयात करावी लागते. निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने देशाची खाद्यतेल गरज भागविण्यासाठी ही आयात करावी लागते. आयात होत असलेले खाद्यतेल निष्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप खाद्यतेल महासंघाने केला आहे.

भारतात यंदा भुईमूग पिकात जवळपास २५ टक्क्यांची घट आहे. त्यामुळे शेंगदाणा तेल महाग झाले आहे. तसे असतानादेखील त्याची निर्यात जोमाने सुरू आहे. २०२२-२३ मध्ये खाद्यतेल किंवा तेलबियांची निर्यात २० टक्क्यांनी वाढून १० हजार ९०० कोटी रुपयांवर जाण्याची चिन्हे आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या खाद्यतेलात ८० ते ८५ टक्के शेंगदाणा व तिळाच्या तेलाचा समावेश आहे. ही निर्यात प्रामुख्याने इंडोनेशिया, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, फिलीपीन्स व युरोपात होत आहे. निर्यात होत असल्यानेच तुलनेने कमी दर्जाच्या खाद्यतेलाची आयात करावी लागत असल्याची स्थिती आहे.

‘भारत हा शेंगदाण्यासह तीळ व मोहरी यासारखे खाद्यतेल व तेलबियांचा सर्वात मोठा उत्पादक आहे. पारंपरिक जवसाच्या तेलबियादेखील भारतातच उत्पादित होतात. ही सर्व पारंपरिक प्रकारची खाद्यतेले पौष्टिक व आरोग्यासाठी सर्वोत्तम असतात. असे पौष्टिक खाद्यतेल देशात उपलब्ध असताना दर वर्षी सूर्यफूल, सोयाबिन व पामसारखे आरोग्याच्यादृष्टीने फारसे सकस नसलेले खाद्यतेल केंद्र सरकारकडून आयात केले जाते. पाम सोडल्यास उर्वरित दोन्ही प्रकारचे खाद्यतेले ही शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे आयात केली जातात. तेलाच्या शुद्धिकरण प्रक्रियेत रसायनांचा वापर होतो. भारतातच आपले पारंपरिक सकस खाद्यतेल उपलब्ध असताना अशा रसायनयुक्त खाद्यतेलांचे सेवन नागरिक करीत आहेत. निर्यात रोखल्यास या स्थितीवर मात करता येईल,’ असे अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

तेलबिया उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

खाद्यतेल महासंघानुसार, निर्यातक्षम (भूईमुग, तीळ व मोहरी) तेलबिया उत्पादनात २२ टक्क्यांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. यात मध्य प्रदेश ३४.६४ टक्क्यांसह आघाडीवर आहे. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व तेलंगणमध्येदेखील तेलबियांचे उत्पादन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *