महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना आजच खातेवाटप होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व आमदारांना मुंबईतच थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीतून परत आले असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना आजच खातेवाटप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे. तर काही आमदारांन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीसाठी बोलावले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या आमदारांसोबत मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहे.
खातेवाटपाचा तिढा सुटला
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या आहेत. आजच दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदारांना फोन केले आहेत. तसेच वर्षा निवासस्थानी तातडीची बैठकही बोलावली आहे.