महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा चालू आहे. २ जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर इतर ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक आमदार आपल्या पाठिशी असल्याचा दावाही अजित पवारांनी केला. त्यामुळे पक्षात आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या ८ मंत्र्यांना खातेपाटपही झालं. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले असून त्यानुसार दोन प्रतोद, दोन विधिमंडळ गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट व शिंदे गटाप्रमाणेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली आहे. त्यामुळे सोमवार अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेमकं काय चित्र दिसणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी दुपारी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या!
२०१९मध्ये काय घडलं होतं?
२०१९मध्ये अजित पवारांनी अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीसांबरोबर सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, ८० तासांचं सरकार निभावून अजित प पवारांनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा स्वगृही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी अजित पवारांसह सर्व मंत्र्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीचे अर्थ काढले जात असतानाच आज दुसरी मोठी बैठक झाली!
आज काय घडलं?
आज अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर भेट घेतली. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेही उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.
“आज अजित पवार व विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला आले होते. आम्ही सगळे इथे आलो. काल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू झाल्यामुळे बरेच आमदार आज इथे हजर होते. त्यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही इथे आलो”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Today, Ajit Pawar, Sunil Tatkare and I met Sharad Pawar at YB Chavan Centre. We again requested him to keep NCP united, and he listened to us but did not say anything on it: Praful Patel in Mumbai pic.twitter.com/AjFXKjGinK
— ANI (@ANI) July 17, 2023
“शरद पवार इथे येणार असल्याचं आम्हाला कळलं, म्हणून…”
“आम्ही माहिती काढली की शरद पवार चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहेत. म्हणून आम्ही इथे आलो. सर्व आमदारांनी शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेतली. काल मी म्हणालो तशीच पक्ष एकसंघ राहण्यासंदर्भात आम्ही शरद पवारांना विनंती केली. शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आता त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही कसं सांगू शकणार?” असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.