महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण विधान परिषदेत प्रचंड गाजले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या या अश्लिल व्हिडिओंचा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. मराठी महिलांचा अनादर करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही सोमय्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. त्यानंतर या प्रकरणी उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे. कुणालाही पाठिशी घालणार नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असा शब्द फडणवीसांनी विरोधकांना दिला. गृहमंत्री फडणवीसांच्या रोखठोक चौकशीच्या आदेशानंतर मुंबई पोलीस कामाला लागल्याने किरीट सोमय्यांची धाकधूक वाढली आहे.
किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओच्या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्याविरोधातली आतापर्यंतची सगळी भडासच काढली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर २० मिनिटांच्या आक्रमक भाषणात सोमय्यांच्या राजकारणाची स्टाईल सांगताना त्यांच्या कथित व्हिडीओ बॉम्बची पोलखोल केली. आठ तासांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ही व्यक्ती ‘सेक्स्टॉर्शन’ करीत असून, असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात,’ असा गंभीर आरोप दानवे यांनी केला. तर सोमय्या यांची सुरक्षा तत्काळ काढून घ्या, अशी मागणी अनिल परब यांनी केली. ठाकरे गटाच्या सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. फडणवीसांच्या घोषणेनंतर मुंबई पोलिसांची टीम लगोलग कामाला लागली आहे.