ITR Filing: आधार-पॅन लिंकिंगवर नवीन अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक एकमेकांशी संलग्न केले नाही तर पॅन क्रमांक उपयोगात आणता येणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार ३० जूननंतर पॅन क्रमांक रद्द होणार असे वृत्त अनेक माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने विस्तृत ट्विट केले आहे. यामध्ये अकार्यरत झालेले पॅन रद्दबातल झालेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पॅन क्रमांक अकार्यरत झाला तरीही संबंधित व्यक्ती जर करदाता असेल तर तिला प्राप्तिकर विवरणपत्र भरता येईल, याकडेही प्राप्तिकर विभागाने लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे परदेशस्थ यांच्या पॅन क्रमांकांबाबतचे गैरसमजही विभागाने या ट्विटद्वारे दूर केले आहेत.

अनिवासी भारतीय (एनआरआय)
मागील तीन करनिर्धारण वर्षांत प्राप्तिकर विवरण भरणाऱ्या अनिवासी भारतीयांना प्राप्तिकर विभागाने निवासी दर्जा दिला आहे. याविषयी संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याला (जेएओ) माहिती दिली गेली आहे. या करदात्यांचा पॅन क्रमांक संलग्नतेअभावी अकार्यरत झाला आहे. ज्या अनिवासी भारतीयांचे पॅन अकार्यरत झाले आहेत त्यांनी त्याच्या निवासी दर्जाविषयीची माहिती संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याला द्यावी. या अधिकाऱ्यांचा तपशील https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

परदेशस्थ भारतीय
परदेशस्थ भारतीयांचे (ओसीआय) पॅन क्रमांक किंवा भारतात निवासी दर्जा मिळालेल्या व पॅनसाठी अर्ज केलेल्या परंतु अद्याप जेएओकडे आपला निवासी दर्जा अद्यायावत न केलेल्या, गेल्या तीन वर्षांचे प्राप्तिकर विवरण न भरलेल्या परदेशी नागरिकांचे पॅन अकार्यरत केले गेले आहेत. ओसीआय व निवासी दर्जा मिळालेल्या परदेशी नागरिकांनी त्यांच्या निवासी दर्जाची माहिती संबंधित जेएओला वैध कागदपत्रांसह द्यावी. जेएओंची यादी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO या लिंकवर देण्यात आली आहे.

अकार्यरत पॅन
अकार्यरत झालेला पॅन क्रमांक रद्दबातल झालेला नाही. त्यामुळे या पॅन क्रमांकाच्या आधारे संबंधित करदात्याला विवरणपत्र भरता येणार आहे. पॅन अकार्यरत झाले असेल तर करपरतावा (रिफंड) व या परताव्यावरील व्याज दिले जाणार नाही. अकार्यरत पॅन झालेल्या करदात्यांचा टीडीएस प्राप्तिकर कायदा कलम २०६एए नुसार वाढीव दराने कापला जाईल. त्याचप्रमाणे या करदात्यांचा टीसीएस कलम २०६सीसी नुसार वाढीव दराने घेतला जाईल.

यासंदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास केंद्री. प्रत्यक्ष करमंडळाने जारी केलेली नोटीस पहावी असे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. ही नोटीस https://incometaxindia.gov.in/communications/notification/notification-15-2023.pdf या लिंकवर जाऊन पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *