महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत असून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ३० कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र, प्रशासनाकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.
Maharashtra | An incident of landslide reported at Irshalwadi village in Khalapur tehsil in Raigad District, two teams of NDRF have been moved: NDRF
— ANI (@ANI) July 19, 2023
इरसाल गडाच्या (Irshalgad Fort) पायथ्याशी आदिवासी पाडे आहेत. यातील एका आदिवासी पाड्यावर रात्री १२ च्या सुमारास दरड कोसळली. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळील चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडलीय. नेमके नुकसान किती झाले आहे, ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
‘हिंदुस्तान टाइम्स’ च्या वृत्तानुसार, आदिवासी पाड्यावर एकूण ६० घरे आहेत. यातील ३० कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मध्यरात्री ही दुर्घटना घडली आहे. खोपोलीचे तहसीलदार आणि अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. “डोंगराळ भाग असल्याने घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चालत जावं लागतंय. आमच्या पथकाला तिथे पोहोचण्यासाठी तब्बल अडीच तास लागले” असं एका अधिकाऱ्याने ‘HT’ला सांगितले आहे. दरम्यान, रायगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नवी मुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयांना अलर्ट जारी केला आहे.