IND vs WI 2nd Test : दुसरा कसोटी सामना आजपासून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । IND vs WI 2nd Test : आजपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताचे वर्चस्व अपेक्षित आहे. हा सामना जिंकून व्हाईटवॉश देण्याची भारताला अधिक संधी आहे; परंतु वैयक्तिक विचार करता अजिंक्य रहाणेसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. शंभरावा कसोटी सामना खेळायचा असल्यास रहाणेला या सामन्यात गुंतवणूक करावी लागणार आहे.

रहाणे ८४ कसोटी सामने खेळला आहे आणि भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या या सामन्यानंतर थेट डिसेंबर महिन्यात पुढचा कसोटी सामना खेळणार आहेत. यातच केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन अपेक्षित आहे. रहाणे एकदिवसीय तसेच टी-२० या प्रकारापासून दूर असल्यामुळे त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यातच भविष्यातील आपले स्थान नक्की करावे लागणार आहे.

१८ महिन्यांनंतर पुनरागमन केल्यानंतर रहाणेने जागतिक कसोटी अंतिम सामन्यात आश्वासक फलंदाजी केली. त्यामुळे उपकर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात पुन्हा पडली, तरीही भविष्यासाठी त्याचे संघातले स्थान निश्चित नाही. आफ्रिकेत खेळण्यासाठी रहाणेसारखा अनुभवी फलंदाज हवाच, असे मत फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी व्यक्त करून दिलासा दिलेला आहे.

पहिल्या कसोटीत १४१ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु कर्णधार रोहित शर्माने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे एक-दोन बदल अपेक्षित आहेत. पहिल्या कसोटीत एकही विकेट मिळवू न शकलेल्या जयदेव उनाडकटला आणखी एक संधी मिळू शकते. मात्र अक्षर पटेलला संधी देण्याचा विचार झाला तर उनाडकटला वगळले जाऊ शकते. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे नव्या चेंडूवर गोलंदाजी करण्यास पुरेसे आहेत. मात्र हा निर्णय खेळपट्टीचे स्वरूप पाहून घेतला जाईल. पदार्पणात दीडशतकी खेळी करून यशस्वी जयस्वालने आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. आता त्यात सातत्य राखावे लागेल.

विराट कोहलीवर लक्ष
पहिल्या कसोटीत विराटने फारच संयम दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याने ७६ धावा केल्या असल्या तरी त्या त्याच्या लौकिकाप्रमाणे नव्हत्या. डिसेंबर २०१८ मध्ये त्याने परदेशात कसोटी शतक केले आहे. हा दुष्काळ तो या कसोटीत संपवतो का, याकडे लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *