महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । देशभरासह राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला (Monsoon Update) सुरुवात झाली आहे. या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Rain) अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, पावसामुळे वाहतूक कोंडी, मार्गावरती पाणी, डोंगराळ भागांत दरड कोसळण्याचा धोका, नद्यांना आलेला पूर पाहून नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
या भागांत पावसाची परिस्थिती
लोणावळा – 204 मि.मी.
लवासा – 77.5 मि.मी.
पोलादपूर – 224.5 मि.मी.
महाबळेश्वर – 196.0 मि.मी.
दापोली – 255.5 मि.मी.
सावरडे – 140.5 मि.मी.
चिपळून – 152.0 मि.मी.
मुरुड – 92.5 मि.मी.
भायखाळा – 119.5 मि.मी.
चेंबूर – 125.0 मि.मी.
भाईंदर – 137.0 मि.मी.
दहिसर – 118.5 मि.मी.
यवतमाळ – 84.0 मि.मी.
या भागांत जोरदार पावसाची शक्यता
राज्यातील पावसाचा वेग पाहता मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पालघरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, कोकणात पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पावसामुळे आज शाळा बंद
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आज या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
रायगडसह या भागांत रेड अलर्ट जारी
सलग दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक राज्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड आणि पुण्यातील घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी, तर, पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.