महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । पुणे जिल्ह्याच्या घाट आणि दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्यांना अतिवृष्टीमुळे आज, उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आज शाळेत आलेल्या मुलांना सुरक्षितपणे घरी सोडता येण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळेत जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा दंडाधिकारी आणि पुणे जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी त्या भागातील शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गटशिक्षणाधिकारी आणि सीपीडीओ यांनी त्या परिसरातील मुलांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित आणि खाजगी शाळांना लागू आहे. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या नियमितपणे सुरू राहतील. या निर्णयामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, पुरंदर, वेल्हे आदी भागांतील ३५५ शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहेत.