महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात गेल्या 3 दिवसांत 499 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इर्शाळवाडीवर दरड कोसळली. ही घटना घडल्याची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाचे लोक तिथे पोहोचले. भौगोलिक परिस्थिती पाहिली तर डोंगरदरीत वसलेली ही वाडी आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
याठिकाणी जाण्यासाठी माणवली या गावातून चालत जावं लागतं. तीव्र उतारावर वस्ती असल्यानं तिथं पोहोचणं कठीण आहे. ठाकर नावाचे आदिवासी समाजाचे लोक या वाडीत राहतात. दरड कोसळण्याची घटना ही बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. यात 25 ते 26 कुटुंब बाधित झाल्याची माहिती आहे. यातील 21 जखमी असून 17 लोकांवर बेस कँप येथे उपचार तर 4 लोकांवक एमजीएम येथे उपचार सुरू आहेत. या घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आगे. तर, इतर लोकांचा शोध घेतला जात आह़े.
स्नायफर डॉग स्क्वाडदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळ हे अतिदुर्ग भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहोचणं अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स पहाटेपासून सांताक्रुज हवाई तळावर बचावासाठी तयार आहेत. मात्र खराब हवामानामुळे उड्डाण करता आलेलं नाही. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्र अधिकारी घटनास्थळावर आहेत. मात्र जेसीबीसारखी यंत्रणा घटनास्थळी नेता येत नाहीये. त्यामुळे त्वरित बचाव कार्य होण्याच्या दृष्टीने सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत बचाव कामासाठी आवश्यक साधनसामग्री आणि मजूर पाठवण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे. ती अद्यापही सुरू आहे जेणेकरून शोधकार्य सुरळीत ठेवून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत सुखरूप काढता येईल.
शक्य तितक्या लवकर ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हा प्राधान्याचा विषय आहे आणि तो प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. विशेषता आता जेसीबी एअरलिफ्ट करून देता येतील का असा प्रयत्न चाललेला आहे. त्याकरता अशा प्रकारचे दोन अर्थ रिमुव्हिंग मशीन आता सांताक्रुजला पोहोचलेले आहेत. जे हेलिकॉप्टरचे पायलट्स आहेत ते त्याचं आकलन करतायेत आणि त्याचा आढावा घेत आहेत की आत्ताची तिथली परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये हे एयरलिफ्ट करून देता येतील का? ते जर त्या ठिकाणी जाऊ शकले तर हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत वेगात करता येईल