Emergency Alert : या मोबाइलवर का आला नाही सरकारकडून इमर्जन्सी अलर्ट? हे आहे कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । वेळ सकाळी १० वाजून २० मिनिटांची. मोबाइल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाइलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका आवाज कशाचा काही समजेना. आपला मोबाइल हॅक झाला की काय की त्यातील डेटा चोरीला गेला. या भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले. अचानक आलेल्या मेसेजमुळे मोबाइलधारकांचे धाबे दणाणले.

याबाबत प्रत्येक जण एकमेकांकडे या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून चौकशी करू लागले आणि काही वेळातच सोशल मीडियावर याविषयीची माहिती व्हायरल होण्यास सुरुवात झाली. देशभरातील कोट्यावधी मोबाइलवर अचानक आलेल्या या मेसेजबाबत चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येताच अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. केंद्र अथवा राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देऊ शकतो.

विशिष्ट भौगोलिक परिसरात अथवा देशभरात एकाच वेळी सर्व मोबाईल नंबरवर आपत्कालीन सूचना पाठविण्याची या विभागाची क्षमता आहे. भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वीच म्हटले होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पोर्टलवर याविषयी अधिक तपशील देणारी माहिती आहे. राज्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी पूरस्थितीचाही धोका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मोबाइल युझरला मराठी, इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आपत्कालीन मेसेज आला. भूकंप, मुसळधार, पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणार आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे.


काहींना हा अलर्ट का नाही आला?

– सरकारनं या यंत्रणेचं टेस्टिंग देशातील सगळ्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांबरोबर केलं होतं.

– पण ज्या हँडसेटमधील आपत्कालीन अलर्टची सेटिंग बंद होती, त्यांना हा अलर्ट आला नाही.

– काही हँडसेटमध्ये आपत्कालीन ‘अलर्ट’ची सेटिंग आधीपासूनच सुरू असते, तर काहींत ती आधीपासूनच बंद असते, जसं की आयफोन. त्यामुळे आयफोनवर हे अलर्ट आल्याचं आढळलं नाही.

– भविष्यात तुम्हाला असे आपत्कालीन अलर्ट हवे असतील, तर तुम्ही तुमच्या हॅण्डसेटच्या सेटिंगमध्ये जाऊन आपत्कालीन अलर्ट सेटिंग सुरू करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *