UPI in Sri Lanka : आता श्रीलंकेतही चालणार यूपीआय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये विविध गोष्टींबाबत करार झाले. यात श्रीलंकेमध्ये यूपीआयला मंजूरी देण्याच्या कराराचाही समावेश होता.


रानिल विक्रमसिंघे यांनी पदभार स्वीकारून आज एक वर्षं पूर्ण झालं. याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर एका संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sri Lanka President India Visit)

“मी, विक्रमसिंघे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं दिल्लीमध्ये स्वागत करतो. पदभार स्वीकारून एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर मी त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या वर्षात श्रीलंकेतील नागरिकांनी भरपूर संकटांना तोंड दिलं आहे. मात्र, एक जवळचा मित्र म्हणून आपण त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे होतो.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

श्रीलंकेत यूपीआय
या भेटीवेळी दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या करारांना मान्यता मिळाली. यात श्रीलंकेमध्ये यूपीआय पेमेंट्सला मान्यता देण्याच्या कराराचा देखील समावेश होता. या करारामुळे दोन्ही देशांमधली फिनटेक (Fintech) कनेक्टिव्हिटी वाढेल, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. (UPI in Sri Lanka)

इतर करार
“भारताच्या ‘शेजारी प्रथम’ पॉलिसी आणि ‘सागर’ व्हिजनमध्ये श्रीलंकेचं स्थान अगदी महत्त्वाचं आहे. आज आम्ही कित्येक द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. श्रीलंका आणि भारताचे विकास आणि सुरक्षेबाबतचे विचार हे एकत्रित गुंफलेले आहेत. आमचं भारत-श्रीलंकेतील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत एकमत आहे.” असं मोदी म्हणाले.

दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी तामिळनाडू ते श्रीलंका फेरी सर्व्हिस सुरू करण्याचा देखील निर्णय घेतला गेला असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.

भारताचे मानले आभार
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले. श्रीलंका संकटात असताना सर्वतोपरी मदत केल्याबद्दल, आणि श्रीलंकेसोबत उभं राहिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. यासोबतच, मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे, आणि भारताचा विकास हा श्रीलंकेसाठी देखील फायद्याचा ठरणार आहे; असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *