महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । पुणे शहरात बुधवारी मोठी कारवाई झाली होती. पुणे शहरात तब्बल दीड वर्षांपासून राहत असलेल्या दोघांना अटक केली गेली. त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू सापडल्या. त्यानंतर ते दोघे मोस्ट वॉटेंड दहशतवादी होते. या दोघांचा संबंध जयपुरात सीरियल ब्लास्टशी असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने त्यांच्यांवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हे दोघे दीड वर्षांपासून पुण्यात राहत असतानाही पोलिसांना त्याचा थांगपत्ता नव्हता. या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
काय घेतला निर्णय
पुण्यात दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सापडल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. भाडेकरार न करता हे दोन्ही दहशतवादी कोंढवा भागात भाडेतत्वावर राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात सादर करणे सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास घरमालकावर गुन्हा दाखल होणार आहे.
सोसायटीला दिल्या सूचना
पोलिसांनी सोसायटीला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांनी पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरुला सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. तसेच ऑनलाइन भाडेकरुचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक पुणे पोलिसांनी जारी केले आहे.
काय होता प्रकार
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी (वय २४) यांना दुचाकी चोरी प्रकरणात पकडण्यात आले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला. त्याची चौकशी सुरु केली असताना ते दोघे घाबरले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता संशयास्पद अनेक साहित्य मिळून आल्या. हे दोन्ही जयपूर बॉम्ब स्फोटाचा कट रचणारे आरोपी असल्याचे त्यानंतर स्पष्ट झाले. दीड वर्षांपासून एनआयए त्याच्या शोधात होती. अखेर ते पुण्यात सापडले.