महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । महाराष्ट्रातील (Konkan Rain) कोकण आणि विदर्भ भागात पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता देशभरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिथं पावसामुळं अनेक राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीत हिमाचल प्रदेशात पावसामुळं नद्यांचे प्रवाह दुप्पट ताकदीनं वाहताना दिसले. ज्यानंतर आता उत्तराखंडमध्ये निसर्ग पुन्हा कोपल्यामुळं वाताहात झाल्याचं स्पष्ट होत आहे.
शुक्रवारी रात्रीपासूनच उत्तराखंडमध्ये पावसानं जोर धरला. ज्यामुळं राज्यातील नद्यांचे प्रवाह आणि पाणीपातळी वाढली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं राष्ट्रीय महामार्गांवर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या.
पिथौरगढ येथे बंगापानी भागात पावसाचा जोर वाढल्यामुळं राष्ट्रीय महामार्गाचा बराच भाग वाहून गेल्याचं वृत्त समोर आलं. बंगापानी ते जाराजीबली या भागांना जोडणारा हा रस्ता वाहून गेल्यामुळं या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं इथं अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. उत्तराखंडमध्ये पावसानं उसंतच घेतली नसल्यामुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, झाललेी वाताहात पाहून अनेकांचं मन सुन्न झालं आहे.
हवामानशास्त्र विभागाकडून पुढील 24 तासांसाठी उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं उत्तकाशी, टिहरी, पौडी, देहरादून, पिथौरगढ, हरिद्वार, बागेश्वर आणि चंपावत या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अनेक गावांशी संपर्क तुटला
उत्तराखंडच्या पौडी येथे थलीसैण भागात शुक्रवारी सायंकाळी ढगफुटीची घटना घडली आणि यामुळं चिखल, दगड रस्त्यांवर वाहून आले. परिणामी यमुनोत्री आणि बद्रीनाथ या चारधामपैकी दोन धामांपर्यंत जाणारे यात्रामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार सध्या उत्तराखंडमधील 100 हून अधिक गावांशी संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळं राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 109 गैरसैंणपासून कर्णप्रयागपर्यंतच्या भागात मोडकळीस आला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तर, मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळं हल्द्वानी – नैनीताल राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे.
गंगेच्या पाणी पातळीत वाढ
देशाच्या पर्वतीय भागांमध्येही सध्या हवामान बिघडलं असून, श्रीनगरपासून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं गंगेच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. गंगेनं धोक्याची पातळी गाठल्यामुळं हरिद्वारमधील बहुतांश भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, गंगेच्या उपनद्याही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या मार्गावर असल्यामुळं सध्या या भागात एनडीआरएफ आणि इतर यंत्रणाही सतर्क आहेत.