Samruddhi Mahamarg : आता समृद्धीवर होणार वाहन चालकांची ‘अल्कोहल टेस्ट’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघाताची (Accident) संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे झालेल्या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाकडून आता अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यातच आता समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिली आहे. दादा भुसे यांनी शुक्रवारी (21 जुलै) समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला, यावेळी जालन्यात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


दरम्यान यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले की, “समृद्धी महामार्गावर आता लवकरच वाहन चालकांची अल्कोहल टेस्ट होणार असून, अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. तसेच काटेकोरपणे वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी पाऊल उचलली जाणार आहे.” तर आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमागे मानवी चुका असल्याचे देखील दादा भुसे म्हणाले. तर आजवर समृद्धी महामार्गावर 32 लाख वाहने धावली असून, त्यामुळे याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं, असेही भुसे म्हणाले.

यामुळे घेतला अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेड राजा जवळ एका खाजगी बसचा अपघात झाला होता. या भीषण अपघातात 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघातात चालकाने मद्य प्राशन केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *