महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्टवॉचची लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये असणाऱ्या अनेक फीचर्ससाठी लोक स्मार्टवॉच घेतात. हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लीप मॉनिटरिंग, कॅलरी काउंटिंग असे कित्येक फीचर्स स्मार्टवॉचमध्ये मिळतात. मात्र, आता हेच फीचर्स तुम्हाला अंगठीमध्ये मिळणार आहेत.
स्वदेशी टेक कंपनी असणाऱ्या ‘बोट’ने एक स्मार्ट रिंग सादर केली आहे. या सिरॅमिक आणि मेटलच्या सहाय्याने बनवण्यात आलेल्या या अंगठीमध्ये कित्येक स्मार्ट फीचर्स देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही रिंग वॉटरप्रूफ असणार आहे. (boAt Smart Ring)
स्मार्ट रिंगमधील फीचर्स
बोट स्मार्ट रिंग वेअरेबल फिटनेस ट्रॅकर असं या रिंगला म्हटलं जाईल. नावात दिल्याप्रमाणे, या स्मार्ट अंगठीमध्ये कित्येक फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स असणार आहेत. यामध्ये यूजरच्या डेली वॉकिंग स्टेप्स काउंटिंग, कॅलरी ट्रॅकर, हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल, स्लीप मॉनिटरिंग अशा फीचर्सचा समावेश असेल. (Tech News)
किंमत आणि लाँच
ही अंगठी अगदी लाईटवेट असणार आहे. त्यामुळे अगदी २४ तास म्हटलं तरी यूजर्स ही वापरू शकणार आहेत. सोबतच, ही अंगठी वॉटरप्रूफ देखील असणार आहे. या स्मार्ट रिंगची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच ती जाहीर केली जाईल. तसंच लाँच झाल्यानंतर फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि बोटच्या अधिकृत वेबसाईटवरुन ही अंगठी खरेदी करता येईल असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
सॅमसंगही आणणार स्मार्ट रिंग
दरम्यान, सेऊलमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपले कित्येक नवीन गॅजेट्स लाँच करणार आहे. यावेळी सॅमसंग देखील आपली स्मार्ट रिंग सादर करेल अशा चर्चा सुरू आहेत.