वरंधा घाट बंदचे आदेश,वाहन चालक ऐकेनात..! अखेर रायगड जिल्हा प्रशासनाने केली अनोखी युक्ती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाण्यासाठी भोर तालुक्यातील वरंधा घाट हा सोपा मार्ग आहे. मात्र, हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वरंधा घाट सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाने आदेश काढले आहेत. मात्र, आदेश काढूनही अनेक वाहने या घाटातून प्रवास करताना पाहायला मिळाली. अखेर रायगड जिल्हा प्रशासनाने पुणे आणि रायागड जिल्ह्याच्या सीमेवर अनेक ठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. २२ ते ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह वरंधा घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. या घाटात.पावसाळ्यात अनेकदा अतिवृष्टी होऊन दरडी कोसळण्याचे.प्रकार घडत आहेत. त्यात रस्ता खचणे, मोठी झाडे पडणे, रस्त्यावरची माती वाहून जाणे अशा अनेक घटना घडत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून ही दक्षता घेण्यात येत आहे.

भोर आणि वेल्हे तालुक्यात घाट परिसरात जोरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पावसाळ्यात दरडी कोसळतात त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. यंदाच्या वर्षी पावसाचा जोर या भागात चांगलाच आहे. तसेच पुण्यातून कोकणात जाणारे अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

रायगड जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रायगडच्या इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. आता सप्टेंबर महिन्यापर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद असेल, याची वाहनधारकांनी नोंद घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *