महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । कोरोना काळ व जम्मू काश्मीर मधील 370 कलम उठवल्यानंतर यंदाची अमरनाथ यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, पहिल्या वीस दिवसांच्या टप्प्यात सुमारे साडेतीन लाख भाविकांनी पावित्र अमरनाथ गुफेतील बर्फाच्या शिव लिंगाचे दर्शन घेतले आहे.
समुद्र सपाटीपासून 13,500 फुट उंचीवर अमरनाथ पावित्र गुफा आहे, गुफेपर्यंत जाण्यासाठी अनंतनाग जिल्ह्य़ातील पहेलगाम मार्गे बत्तीस किलोमीटर चंदनवाडी, पिसु टॉप, जोजपाल, शेषनाग, वावल टॉप, एमजी टॉप, पौषपत्री, पंचतरणी, संगम टॉप येथून गुफापर्यंत जाता येते. तर गंदेरबल जिल्ह्य़ातील बालटाल येथून डोंमल, रेलपत्री, बारी, संगम टॉप मार्गे सतरा किलोमीटर अंतरावर पावित्र गुफा आहे.
यंदा पहिल्या वीस दिवसातच साडे तीन लाख भाविकांचा टप्पा पार झाला आहे त्यामुळे यात्राकाळ पूर्ण होई पर्यंत सहा लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून संध्याकाळी पहेलगाम व बालटाल मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जातो, रस्त्यामधील यात्रेकरूंना थांबण्यासाठी ठिक ठिकाणी कॅम्प केलेले असून येथे राहण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध केल्या आहेत.
पहेलगाम चंदनवाडी मार्गे गुफा 32 किलोमीटर अंतरावर असून प्रशासनाने यात्रे दरम्यान यात्रेकरूंना थांबण्यासाठी शेषनाग, पंचतरणी येथे राहण्यासाठी कॅम्प केलेले आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश मधील भाविकांनी ठीक ठिकाणी लंगर उभारलेले आहे. त्यामुळे जेवण, नाश्ता, पाणी गरज पडल्यास राहण्यासाठी सोय केलेली आहे.
बालटाल मार्गे अमरनाथ गुफा 17 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या मार्गावर यात्रे दरम्यान राहण्यासाठी कोठेही व्यवस्था नाही. डोंमल व बालटाल येथील बेसकॅम्प येथे प्रशासनाने राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. बालटालचा मार्ग कमी अंतराचा असल्यामुळे येथून एक दिवसात यात्रा करता येते त्यामुळे या मार्गावरून भाविक मोठय़ा संख्येने यात्रा करतात.
पंचवीस वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रा केवळ पहेलगाम मार्गे करता येत होती, यात्रे दरम्यान भाविकांना खूप कष्टप्रद खडतर प्रवास करत यात्रा करावी लागत होती. दरम्यान लष्कराने 1998 साली बालटाल ते अमरनाथ गुफेपर्यंतचा 17 किलोमीटर अंतराचा मार्ग तयार केला. त्यामुळे भाविकांना यात्रा एका दिवसात पूर्ण करता येते.
अमरनाथ गुफेजवळ मागील वर्षी ढगफुटी झाल्यामुळे काही भाविकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी गुफेजवळ केवळ काही लंगर असून कोणत्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे भाविकांना पावित्र गुफेचे दर्शन घेऊन बालटाल बेस कॅम्प किंवा पहेलगाम मार्गावरील पंचतरणी येथे मुक्कामी जावे लागते.
यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी जम्मू पासून सुरू होणाऱ्या संपूर्ण यात्रा मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सुरक्षित प्रवास होतो.
अमरनाथ यात्रा काळ दरवर्षी वेग वेगळा असतो पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत यात्रा सुरु असते. यावर्षी यात्राकाळ साठ दिवसांचा आहे. पावित्र गुफेच्या दर्शनासाठी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केले जाते, पावसामुळे अनेक वेळा यात्रा थांबवली जाते. त्यामुळे बुकिंग केलेल्या तारखेला दर्शन मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे यात्रेसाठी एक दोन आगाऊ दिवस ठेवावे लागतात. पहेलगाम मार्गे जाणार्या भाविकांनी यात्रेसाठी ऑनलाइन मिळालेल्या तारखेनुसार जावे त्यामुळे यात्रा वेळेत सुखकर पार पडते.