महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील आणखी 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासोबतच पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई आणि ठाण्यातही यलो अलर्ट असून इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून आज दुपारनंतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा भागात – जोरदार पाऊस झाल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत.
तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर सुरू असल्याने पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.