महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । १७ जुलै (सोमवार) पासून विधानसभा आणि विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सभागृहात निधी वाटपाचा मुद्दा गाजत आहे. सत्ताधारी पक्षाकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, हा वाद सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना सभागृहात कृषी मंत्री किंवा संबंधित जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने भाजपा आमदार सुरेश धस यांचा पारा चढला. सभागृहात उशिरा येणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना समज दिली पाहिजे, अशी मागणीही सुरेश धस यांनी केली.
यावेळी सुरेश धस सरकारला घरचा आहेर देताना म्हणाले, “आमच्याकडे गाडी जरी नसली तरी आम्ही टॅक्सी करून इथपर्यंत वेळेवर येतो. आम्ही तीन-तीन जिल्ह्यातून निवडून येतो. विधानसभेतूनही काही माणसं इथे निवडून येतात. आम्ही काय पागल-बिगल आहोत का? इथं येऊन बसायला. इथे मंत्री नाहीत… अधिकारी नाहीत… ते दहा मिनिटांनी उशिरा आले. त्यांना समज दिली पाहिजे. हा आमचा हक्क आहे. हे सर्वोच्च सभागृह आहे. सभागृहात आम्ही गोट्या खेळायला येतो का? येथे कृषी विभागाचा कोणता जबाबदार अधिकारी आला आहे, ते मला सांगा. आम्ही आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत.”