महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होतेय. या मालिकेतही रोहित शर्मा हाच भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच रोहित ओपनिंगला येणार आहे. मात्र रोहितची साथ कोण देणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. कारण ओपनिंगसाठी जागा एक आणि दावेदार 4 आहेत.
शुबमन गिल याने आतापर्यंत या वर्षात 9 वनडेंमध्ये 78 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. आयपीएल 16 व्या मोसमातही गिलने छाप सोडली. इतकंच नाही, तर गिलने न्यूझीलंड विरुद्ध वनडेत द्विशतक केलं. त्यामुळे रोहितसोबत ओपनिंगसाठी शुबमनचं नाव आघाडीवर आहे.
ऋतुराज गायकवाड याला कसोटी मालिकेत पदार्णाची संधी मिळाली नाही. मात्र ऋतुराजचा वनडे टीममध्ये समावेश आहे. ऋतुराजने आयपीएल आणि एमपीएल स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या. त्यामुळे टीम मॅनेजमेंट ऋतुराजवर विश्वास दाखवत रोहितसोबत ओपनिंगला पाठवते का, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
ईशान किशन हा देखील रोहित शर्मा सोबत ओपनिंग करु शकतो. ईशानमुळे लेफ्ट-राईट जोडी जमेल. तसेच ईशानने बांगलादेश विरुद्ध ओपनिंग करताना डबल सेंच्युरी केली होती. तसेच ईशानने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगवान अर्धशतक केलं होतं. त्यामुळे लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनचा विचार केल्यास ईशानला रोहितसोबत खेळण्याची संधी मिळू शकते.
संजू सॅमसन याचं विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेतून टीम इंडियात कमबॅक झालंय. संजूला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सलामीला येऊन खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ओपनिंगसाठी संजू सॅमसन याचं नावही नाकारता येत नाही.