जोरदार पाऊस : कोल्हापुरात पुराची शक्यता तर मुंबईत गेल्या वर्षीचा पावसाचा विक्रम मोडीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजे बुधवारी उघडल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी ५ फुटांनी वाढून ४५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राधानगरीसह कोल्हापूर शहर, ग्रामीण भाग, करवीर या भागांना अलर्ट करण्यात आले आहे. ४५ फुटांपर्यंत पाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते येथील सर्व नागरिकांचे दुपारपर्यंत स्थलांतर करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत निघाला असून १ जुलै ते २६ जुलैपर्यंतच १५५७.८ मिमी विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुलैत १५०२ मिमी इतका पाऊस झाला होता, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मुंबई, रायगड, चंद्रपुरात शाळांना सुटी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिमुसळधार पावसात स्कूल बस चालवण्यात येणर नाही. रायगड जिल्ह्यातही शाळांना सुटी देण्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गुरुवारी शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.दरम्यान, हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे. यामुळे महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीत जाऊन,पंचगंगेत यायला व पुढे शहरापर्यंत पोहोचायला १५ तास, कोल्हापुरातून इचलकरंजी पोहोचायला ६ ते ८ तास व तेथून शिरोळमध्ये पोहोचायला ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे राधानगरीकाठची गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले व शिरोळ या भागांना अलर्ट देण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील पंचगंगेसह कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महाबळेश्वर, शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे, तर सांगली, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, जत तालुक्यात पावसाने रिमझिम हजेरी लावली.

कोयनेत ६१.३० टीमएसी पाणी

सांगली जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून वारणा धरणात २७.९६, तर कोयना धरणात ६१.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणेला पूर आला असून सांगलीजवळ आयर्विन पूल येथे कृष्णेची पातळी १९.३ फुटांवर स्थिर झाली आहे. जिल्ह्यात पावसाची उघडझाप होत असली तरीही कृष्णा आणि वारणा काठावरील नागरिक आता ‘गॅस’वर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *