महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस भोर तालुक्यात 185.5, तर लवासा भागात 86, तर गिरीवन येथे 55.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर हवेचा दाब कमी झाल्याने तेथे पावसाचा जोर अधिक आहे. जिल्ह्यात मुठा खोर्यात पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीत विसर्ग करण्यात आला. पानशेत व वरसगाव धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे.
निरा खोर्यातही जोरदार पाऊस बरसलेला नाही, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. खेड तालुक्याच्या डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. बारामती व इंदापूर तालुक्यात गुरुवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. शिरुर, दौंड, पुरंदर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर कामशेत बोगद्याच्या जवळ रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान मुंबई लेनवर दरड कोसळली.