महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओम भांगे – पुणे – ता. १९ – पेट्रोल आणि डिझेल दरात सलग १३ व्या दिवशी वाढ झाली. गेल्या १३ दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ७.११ रुपयांनी तर डिझेल ७.६७ रुपयांनी महागले आहे. आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे ५६ पैसे आणि ६३ पैशांनी वाढ झाली. तर मुंबईत पेट्रोल दरात ५५ पैसे आणि डिझेल दरात ६० पैशांनी वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८.३७ रुपये तर डिझेलचा दर ७७.०६ रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल- डिझेल दरात सलग १३ व्या दिवशी मोठी वाढ करण्यात आल्याने आगामी काळात महागाई भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर स्थिर असतानाही तेल कंपन्यांकडून दररोजच्या दरवाढ सुरु आहे. ७ जूनपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज सरासरी पन्नास पैशांची वाढ होत आली आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास स्थिर असले तरी मागील तेरा दिवसांपासून पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढविण्यात येत आहेत.