महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – ता. १९ – इंडीयन प्रिमिअर लीग म्हणजेच IPL चं प्रमुख प्रायोजकत्व VIVO कंपनीकडेच राहणार आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हिंदुस्थान आणि चीनमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भूमिका सामान्य नागरिकांनी घेतली आहे तर दुसरीकडे सरकारने देखील चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय देखील आयपीएलच्या प्रायोजकांबाबत काहीतरी निर्णय घेईल अशी आशा व्यक्त केली जात होती. यावर बीसीसीआयने या स्पर्धेसाठीचा मुख्य प्रायोजन व्हिवो मोबाईल कंपनीच असेल असं म्हटलं आहे. व्हिवो ही चायनीच कंपनी आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून यामध्ये त्यांनी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांना याबाबत प्रश्न विचारले होते. धुमाळ यांनी सांगितले की हा करार आमच्या आधीच्या लोकांनी केलेला आहे. ‘मी वैयक्तिकरित्या चिनी वस्तूंवर बंदी घालावी या विचारांचा आहे’ असे धुमाळ यांनी म्हटले आहे. मात्र कंत्राटे देणं आणि प्रायोजकत्व मिळवणं यात फरक असल्याचं ते म्हणाले. चिनी कंपन्या हिंदुस्तानात त्यांची उत्पादने विकतात मग या कंपन्यांकडून मिळणाऱ्या प्रायोजकत्वाचा पैसा आपण देशाबाहेर का पाठवावा असा धुमाळ यांनी प्रश्न विचारला आहे.
जुलै 2017 मध्ये व्हिवो कंपनीला या स्पर्धेसाठीचे प्रायोजकत्व मिळाले होते. 2199 कोटींचा हा करार होता आणि ही रक्कम मूळ किंमतीच्या 267 टक्के जास्त होती. आश्चर्याची बाब ही आहे की या करारासाठीच्या संपर्धेत दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ही OPPO होती. ही देखील चिनी मोबाईल कंपनीच आहे. या स्पर्धेसाठीच्या प्रसारणाचे हक्क स्टार इंडियाने 16347 कोटींना विकत घेतले होते. यासोबत प्रमुख प्रायोजकत्वाचा 2199 कोटींचा करार झाल्याने आयपीएल की मालामाल क्रिकेट स्पर्धा झाली आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आणि लॉकडाऊनमुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळवता येईल अशी आयोजकांना आशा आहे.