नशीब ! कचरा वेचणाऱ्या महिलांनी वर्गणी काढून खरेदी केले लॉटरीचे तिकीट, लागला 10 कोटींचा ‘जॅकपॉट’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । कोणाचे नशीब कधी उजळेल सांगता येत नाही. एका रात्रीत राजाचा रंक तर, रंकचा राजा झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. आता असाच एक प्रकार केरळमध्ये घडला आहे. येथे कचरा वेचणाऱ्या महिलांना कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली आहे.

केरळच्या मल्लामपुरम जिल्ह्यातील परप्पनंगडी नगर पंचायतीत कचरा वेचणाऱ्या 11 महिलांनी लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे साधे 250 रुपयेही नव्हते. अखेर सर्व महिलांनी 25-25 रुपये वर्गणी काढण्याचे ठरवले. यातील एका महिलेकडे ते पैसेही नव्हते. अखेर तिने ओळखीच्या व्यक्तीकडून उधार घेऊन आपली वर्गणी दिली.

नशिबाचा डाव खेळणाऱ्या या महिलांना आपण कोट्याधीश होणार आहोत याची कल्पनाही नव्हती. पण म्हणतात ना भगवान देता है तो छप्पर फाड के. झालेही तसेच आणि या महिलांना 10 कोटींचा जॅकपॉट लागला. बुधवारी काढण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये या महिलांनी कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकली. हे कळताच महिलांनी जल्लोष केला.

याबाबत बोलताना राधा नावाची महिला म्हणाली की, मी माझ्या सहकाऱ्याकडून उसने पैसे घेऊन वर्गणी दिली. आम्ही याआधीही वर्गणी काढून लॉटरीचे तिकीट खरेदी केले आहे. मात्र पहिल्यांदाच आम्ही एवढं मोठे बक्षीस जिंकले आहे.

अन्य एका महिलेने सांगितले की, लॉटरी निघाली तेव्हा पलक्कड मधील कोणीतरी कोट्यवधी रुपये जिंकल्याचे कळलं. आधी आम्हाला वाटलं की दुसरे कोणीतरी असेल, त्यामुळे आम्ही दुःखी झालो. मात्र लॉटरी जिंकणारे आम्हीच आहोत हे कळलं तेव्हा आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आम्ही हरित कर्म सेनेच्या माध्यमातून कचरा गोळा करतो. या पैशात आमचे घर कसेबसे चालते. मात्र आता लॉटरी जिंकल्याने आमची स्वप्न पूर्ण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *