वर्क फ्रॉम होम ; शारीरिक हालचाली कमी झाल्यान आजारांना निमंत्रण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । कोरोना काळात कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेले वर्क फ्रॉम होम आता कर्मचार्‍यांच्या आरोग्यास घातक ठरू लागले आहे. या बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. पर्यायाने, कर्मचार्‍यांमध्ये पाठीचे, पोटाचे, मानेचे विकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे, घरूनच काम असल्याने स्वयंशिस्त राहिलेली नाही. पर्यायाने, कर्मचार्‍यांना मधुमेह, लठ्ठपणा, ताणतणाव, उच्च रक्तदाब, अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोना काळात आयटी व इतर क्षेत्रांतील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. कोरोनाकाळात घरी बसून काम करणे सुरक्षित असल्याने या संकल्पनेचे कौतुक झाले. मात्र, कोरोनाची साथ ओसरल्यानंतर बर्‍याच कंपन्यांनी हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे. त्यामध्ये आठवड्यातील काही दिवस कार्यालयात जाऊन, तर काही दिवस घरून काम करावे लागत आहे. दरम्यान, काही कंपन्यांमध्ये मात्र अद्यापही वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीनेच काम सुरू आहे.

टार्गेटवर आधारित कामामुळे ताण
घरातूनच काम करताना बर्‍याच आयटी अभियंत्यांना टार्गेटवर आधारित काम दिलेले असते. त्यांना दरमहा किंवा दिवसाला दिलेल्या कामाचे टार्गेट पूर्ण करायचे असते. ते काम तुम्ही किती तासांत पूर्ण करता, हे कंपनीसाठी महत्त्वाचे नसते. तर, काम पूर्ण होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे बर्‍याचदा कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ आयटी अभियंत्यांना काम करावे लागते. कधीकधी त्यासाठी जागरण करावे लागते. त्याचा परिणाम कौटुंबिक ताणतणाव वाढण्यात होतो. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याने कुटुंबीयांची चिडचिड वाढते. मानसिक व शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते.

आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची कारणे
कामाचे वाढलेले तास
वाढलेला ताण
बदललेली बैठी जीवनशैली
व्यायामाचा अभाव
सहकार्‍यांशी कमी झालेला संवाद

घरातून काम करताना योग्य पद्धतीने बसून काम करण्यावर भर द्यायला हवा. सतत एका ठिकाणी असलेल्या बैठ्या कामामुळे मानेचे विकार, मणक्यांचे विकार होतात. तसेच, फास्टफूडचे अतिरेकी सेवन, टार्गेटवर आधारित कामामुळे वाढलेले ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार जडू लागतात. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी वेळीच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

– डॉ. सत्यजित पाटील, फॅमिली फिजिशियन आणि सहसचिव, निमा संघटना (महाराष्ट्र)

वाढलेल्या कामामुळे संवाद कमी होतो. वेळेअभावी जंकफूडचे सेवन केले जाते. सतत संगणकासमोर बैठे काम केल्याने पचनाचे विकार जडतात. स्थूलपणा, पित्ताचे आजार, पाठीचे, मानेचे विकार जडतात. त्याचबरोबरच काही जणांमध्ये स्थूलपणा वाढतो. त्याचा परिणाम मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांना निमंत्रण मिळते.

-डॉ. सत्यजित पाटील, फॅमिली फिजिशियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *